चामोर्शी बसस्थानकाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; शाळांसमोर बसस्थानक, अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा पेच.
Oplus_131072
चामोर्शी : शहरातील नव्या बसस्थानकाच्या जागेच्या निवडीवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिवाजी हायस्कूल तसेच यशोधरा विद्यालयाच्या समोरच मुख्य बसस्थानक उभारण्यात आल्याने भविष्यात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. बसस्थानकाकडे ये-जा करण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने मोठ्या बसेसची वर्दळ वाढल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बसस्थानकाच्या समोरच दोन शैक्षणिक संस्था असल्याने शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यातच बसची ये-जा वाढल्यास शाळकरी मुला-मुलींना रस्ता ओलांडताना तसेच बसस्थानक परिसरातून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

बसस्थानक हे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असल्याने त्यासाठी प्रशस्त प्रवेशमार्ग, बसेसच्या वळणासाठी पुरेशी जागा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, चामोर्शीतील बसस्थानकाची जागा पाहता अरुंद मार्गामुळे बसेसची नियमित ये-जा कशी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
‘बसस्थानक की वाहतुकीचा नवा कोंडीबिंदू?’
बसस्थानकासाठी प्रशस्त जागा आणि रुंद रस्ता उपलब्ध असलेले ठिकाण निवडण्याऐवजी गल्लीसदृश अरुंद रस्त्याच्या ठिकाणी बसस्थानक उभारल्याने त्याची भव्यता आणि नियोजनाची संकल्पनाच हरवली असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. भविष्यात बसची संख्या व वाहतूक वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने बसस्थानकाची जागा, प्रवेशमार्ग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा पुन्हा एकदा गांभीर्याने आढावा घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

