खड्डे, चिखल आणि झाडाझुडपांनी भेंडाळा-लखमापूर बोरी मार्ग धोकादायक.
Oplus_131072
दुरुस्तीअभावी वाहनचालक, विद्यार्थी व शेतकरी त्रस्त; तातडीने उपाययोजनांची नागरिकांची मागणी

भेंडाळा :चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-लखमापूर बोरी मार्गाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, पावसामुळे निर्माण झालेला चिखल आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडाझुडपे यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भेंडाळा-लखमापूर बोरी मार्गावर सगणापूर, कान्होली, एकोडी, कळमगाव यासह अनेक गावांचा संपर्क येतो. या मार्गावर एसटी बससेवाही सुरू असल्याने विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कर्मचारी आणि नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याची अवस्था खराब असल्याने प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
कळमगाव परिसरात खड्ड्यांचे जाळे
कळमगाव परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. पाण्याखालील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे. वाहनांचे नुकसान होत असून किरकोळ अपघातांचाही धोका वाढला आहे.
झाडाझुडपांमुळे रस्ता अरुंद
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडेझुडपे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी कमी झाली असून समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण जात आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोठ्या अपघातापूर्वी दुरुस्तीची मागणी
या मार्गावरून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याची तातडीने डागडुजी करून खोल खड्डे बुजवावेत, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडाझुडपे हटवावीत आणि मार्गाची कायमस्वरूपी सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
