कुनघाडा–गिलगाव-माल्लेर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?
Oplus_131072
खड्ड्यांनी कुनघाडा –गिलगाव मार्गाची दैना; वाहनधारकांसह विद्यार्थ्यांचे हाल

चामोर्शी : कुनघाडा रै फाटा ते गिलगाव जमी या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी डांबर व गिट्टी उखडल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचत असल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चामोर्शी–गडचिरोली महामार्गापासून पूर्वेकडे सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुनघाडा रै फाट्यापासून गिलगाव जमी व माल्लेर मालकडे जाणाऱ्या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे. विशेषतः तलाव रोड परिसरातील हनुमान राईस मिलसमोर तसेच श्रीसंत गोस्वामी बाबा मंदिरासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
खड्ड्यांमुळे वाहनांची ये-जा संथ होत असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीचीही परिस्थिती निर्माण होत आहे. यापूर्वी संबंधित बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले; मात्र अल्पावधीतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या दोन्ही मार्गांच्या मध्यवर्ती भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असून, माल्लेर माल मार्गावर जिल्हा परिषद शाळा, तर गिलगाव जमी मार्गावर वनपरिक्षेत्र कार्यालय व महसूल मंडळाची कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच शासकीय कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींची या मार्गावर नियमित वर्दळ असते.
खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित बांधकाम विभागाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
