चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात अज्ञात तरुणाचा निघृण खून; डोक्यात धारदार हत्याराने वार.
Oplus_131072
चामोर्शी : तालुक्यातील वाघोली शिवारात अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात इसमाचा डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ७ सप्टेंबरच्या रात्री उघडकीस आली. या घटनेने चामोर्शी तालुक्यात खळबळ उडाली असून, मृताची ओळख पटविणे आणि हत्येचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चामोर्शी-मुल मार्गालगत वाघोली शिवारात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने संबंधित इसमाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृताची ओळख अद्याप अनोळखी
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांनी त्याचे वर्णन जाहीर केले आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट आहे. रंग गोरा असून शरीरयष्टी सडपातळ आहे.
मृताच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट होती. गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ, तर पायात पॅरागॉन कंपनीची प्लास्टिक चप्पल आढळून आली.
माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
या वर्णनाशी साधर्म्य असलेली व्यक्ती आपल्या परिसरातून बेपत्ता असल्यास किंवा मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ चामोर्शी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, मृत व्यक्ती कोण आहे आणि या हत्येमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिसरातील संभाव्य सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.
या घटनेमुळे वाघोलीसह चामोर्शी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे.
