Spread the love

 

सावली, दि. २ जुलै : सावली तालुक्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यात आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याहाड येथील अतुल गोहणे हे दुचाकीने सोनापूरकडे जात असताना व्याहाड–सोनापूर मार्गावर अचानक रानटी हत्ती समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे.

समोर हत्ती दिसताच अतुल गोहणे यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्यावरच सोडून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त संचार सुरू असून, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता मानवी जीवितालाही धोका निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर आढळून आला होता.

दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, नागरिकांना वेळेवर इशारे देणे आणि संवेदनशील भागात तातडीने सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
वनविभागाकडून या घटनेचा अधिकृत तपास सुरू असून, हल्ल्याचे नेमके कारण आणि इतर तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *